मौन (silence) ही एक शक्ती
नाशिक येथील इगतपुरी येथे "विपश्यना -10 दिवसीय ध्यान शिबिर" ला मी बरेचदा गेलो आहे. माझ्या आईला "ध्यानसाधना" ची विशेष आवड होती. माझी आई रोज पहाटे 5 वाजता उठून "ध्यानस्थ " बसत असे. तिनेच मला सर्वप्रथम "विपश्यना" ध्यान शिकवली. नंतर आचार्य गोएंका गुरुजी च्या मार्गदर्शन खालील चालत असलेली "विपश्यना " ध्यानसाधना मी शिकलो. मी तर लहानपणी मिळेल त्या गुरुजीचे मार्गदर्शनखाली ध्यान शिकत असे.
"विपश्यना" आणि "झेन" हे दोन्ही बौद्ध ध्यानसाधना आहेत.. मला "झेन" ही ध्यान साधना जास्त चांगली जमली.. "झेन" ध्यान साधना ही "कूंग फू , ज्युडो कराटे आकायडो" या "मार्शल आर्ट" मध्ये अध्यात्मिक भागात बौद्ध भिक्षूकडून जास्त सराव केली जाते.. या सर्व प्रकारच्या ध्यान मध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे "मौन" राहण्याची कला..
"मौन राहणे" ही कला आहे, हे मला सर्वप्रथम "विपश्यना" ध्यान करताना समजले. विपश्यना च्या 10 दिवसाच्या शिबिर मध्ये 9 दिवस तरी कोणाशीही बोलायचे नाही आणि कोणालाही स्पर्श करायचे नाही हा नियम होता. या 9 दिवसात मनातल्या मनात स्वतःशी देखील जास्त बोलायचे नाही. 9 दिवस शांत राहणे हे तुम्हाला वाटत तेवढं सोपे नाही. मनात जे विचार येतील त्यांना पण "साक्षीभाव " मध्ये पाहायचे, त्यांच्यावर देखील " क्रिया किंवा प्रतिक्रिया" द्यायची नाही, याला "उपेक्षा " म्हणतात. इगतपुरी नाशिक येथील निसर्गाच्या मनमोहक वातावरण मध्ये तुम्ही 9 दिवस मौन मध्ये आहात ,तर तुम्हाला एक "विलक्षण ऊर्जा" जाणवत असते..
आपण सतत बोलत राहतो आणि सतत विचार करत राहतो (विचार पण एक प्रकारचे बोलणेच आहे) ,त्यातून आपली खूप ऊर्जा ही अनावश्यक खर्च होते. खूप बोलणे ही एक सवयच निर्माण झाली आहे. मौन हे ध्यानसाधना मध्ये अत्यंत आवश्यक असते. मौन ही ध्यानाची प्रथम पायरी आहे... प्रत्येकाने काही क्षण हे एकांत मध्ये राहून स्वतःला दिलं पाहिजे. जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा आपल्या मनातील चांगले, वाईट किंवा निरर्थक विचारांची आपल्याला जाणीव होते. विचार कशाप्रकारे वाणी मध्ये रुपांतरीत होतात या प्रक्रियाचे तुम्ही शांतपणे निरीक्षण करता. तेव्हा "प्रज्ञा" च विकास होतो. प्रज्ञा म्हणजे ज्ञान किंवा शहाणपण (wisdom) आपण म्हणू शकतो. भगवान गौतम बुद्धांनी "सम्यक दृष्टी" ,"सम्यक वाणी" याला अष्टांगिक मार्गात सर्वप्रथम स्थान दिलं आहे. मौननंतर जी वाणी येते किंवा शब्द येतात ,त्यात तुमच्या "प्रज्ञा" आणि "करुणा" चे सामर्थ असते.
मौन मध्ये आपण अस्तित्वाशी जोडले जातो. नाहीतर आपण शब्दाच्या जंगलात हरवलेलो असतो. क्रिया प्रतिक्रिया आणि तर्कवितर्क करत आपण कधी स्वतः ला विसरतो हे आपल्या कळत नाही. हा "विसर" च आपल्यात "मी पना" (अहंकार ego)उत्पन्न करतो. आपल मन आपल्याला अस्तित्व पासून वेगळे मानते. मग अहंकारातून दुःखाचे चक्र सुरू होतात. मौन धारण केल्यावर तुम्ही मूळ शुद्ध स्वरूपात येता. पक्षांचा किलबिलाट , पावसाची रिमझिम, धबधबातून कोसळणाऱ्या धारा यातील निसर्गाचे मधुर आणि सूक्ष्म संगीत हे तुमच्या चित्त ला शांत करते. तुम्ही कधी समुद्रकिनारी किंवा उंच पर्वत रांगा चे सानिध्यात गेलात तर तुम्हाला जाणवेल की तुमचे मन तिथे आपोआप शांत होते. आपण आपोआप निशब्द होतो.. असे का घडत असावे ? जे निसर्गाचे विराट रूप आहे ते क्षणभर तुम्हाला समाज आणि माणसापासून तोडते आणि अस्तित्वाशी जोडते.. त्या मनमोहक सुंदर अशा विराट निसर्गाच्या रूपासमोर तुम्हाला तुमचे प्रश्न छोटे वाटतात किंवा तुम्हाला दुःखाचा विसर पडतो.
असेच ध्यान (Meditation) मध्ये घडते. जेव्हा आपण मौन धारण करतो , तेव्हा तुम्ही अंतर्मनाच्या जास्त जवळ असता. अंतर्मन हे मनाचे व अस्तित्वचे शुद्ध आणि विराट रूप आहे. म्हणून कधी तुम्हाला मानसिक ताणतणाव निर्माण झाला , तर काही क्षण म्हणजे निदान 1 तास हे एकांतात मौनमध्ये राहावे किंवा तसे शक्य नसेल तर जास्त बोलू नये. आवश्यक तितकेच बोलावे. अनावश्यक बडबड करू नये. तुम्ही पुन्हा ताजेतवाने होणार हे नक्की आहे..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment