पाठांतर पेक्षा विषय समजून घेवून अवांतर वाचन करावे..
आपल्याकडे शिक्षणपद्धती ही "पाठांतर" वर आधारित आहे. ज्याला सामान्य ज्ञान मधील एखादया प्रश्न चे उत्तर देता येत नाही म्हणून त्याला ट्रोल करू नका.. ट्रोल करायचे असेल ,तर शिक्षणपद्धतीला करा. कारण आपण शाळेतून काय प्रकारचं शिक्षण घेतो, यावर सर्व अवलंबून असते . काही पाठांतरवादी शिक्षकांनी मुलांना पाठांतर करण्याची प्रचंड सवय लावल्यामुळे आपल्या शिक्षणाचा दर्जा खूप घसरला आहे.. पाठांतर हे काही विषयात आवश्यक असते, मात्र इतर विषय हे तुम्हाला समजूनच घ्यावे लागतात. गणित व विज्ञान तुम्ही पाठ करू शकत नाही. पाठांतरला पण काहीतरी लॉजिक लागते.. रोज एखादी गोष्ट नजरे समोर गेली आणि इतिहास मध्ये क्रम (sequence) लक्षात घेतला की , सर्व गोष्टी लक्षात राहतात.. पानिपत चे पहिले युद्ध "बाबर आणि इब्राहिम लोदी" मध्ये झालेलं, पानिपत दुसरे युद्ध "खेमु आणि अकबर " मध्ये आणि तिसरे पानिपत युद्ध "मराठा आणि अहमदशाह अब्दाली, यांच्यात झालेलं, अशा इतिहासाला गोष्टी आणि क्रम स्वरूपात समजून घेतले की सर्व लक्षात राहते..
तुम्ही व मी आपण सर्वांनी हे अनुभवले आहे. आपण सर्वांनी काही चुका केल्या आहेत. ज्ञान मिळवताना कमीपणा बाळगू नये. 6 वी 7 वी चे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र मी अजून वाचतो. तेव्हा जे विषय समजून नाही घेतले किंवा विषयाचा विसर पडला असेल, तर ते आता समजून घेतो आहे..गणित व भूमीती हे माझे सर्वात आवडते विषय होते. 11 वी पासून माझे "फिजिक्स" वर प्रेम होते. पण आपल्याकडे शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यावर इतका दबाव असतो आणि त्या वयात मुलांमध्ये प्रगल्भता (maturity) पण कमी असते, की बरेच विषय समजून घेण्यास वेळ कमी पडतो..जोवर अभ्यास करतात आणि विषय समजून घेतात, तोवर परीक्षा सुरू होते.. मार्क जास्त मिळवायचे म्हणून मुलांची पाठांतर भोकमपट्टी सुरू होते. यात प्रत्यक्ष (प्रॅक्टिकल) ज्ञान मुलांना मिळत नाही आणि शिक्षक देखील मूळ संकल्पना समजावून सांगत नाही..उदा. ऑस्ट्रेलिया हा देश पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आहे हे पाठांतर करायची गरज आहे का ? पृथ्वीची प्रतिकृतीमध्ये पृथ्वीचे गोलार्ध मुलांना दाखवा, ऑस्ट्रेलिया देश कायम लक्षात राहील.. आमच्या मेडिकल सायन्स मध्ये "शरीररचनाशास्त्र (anatomy)" हा भूमिती सारखा विषय आहे..त्यात शरीराचे रचनाचा अभ्यास असतो. कुठला अवयव, कुठली धमणी, कुठले हाडे ,कुठली ग्रंथी, कुठे काय आहे वगैरे वगैरे यात शिकले जाते .काही मुलं हे पण पाठ करतात. यात पाठ करण्यासारखे काय आहे ? माणसाचे शरीर ला माणूस पाठ करतो, हे आश्चर्य नाही का ??
आपल्याकडे डॉक्टर, इंजिनियर, CA, वकील असे एका क्षेत्रात विद्वान लोकांना पण 10 वी च्या शिक्षणातील बहुतांश मुख्य संकल्पना समजलेले नसतात.. काही विषयातील त्यांचे ज्ञान हे 10 वी चे विद्यार्थी इतके पण नसते.. मी मेडिकल क्षेत्रात पदवीधर झालो तेव्हा मी इतर विषय अधिक तीव्रतेने समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आले की ते विषय आपल्यासाठी खूप दूर गेले आहेत.. त्या विषयात मी अडाणी आहे हे मला समजले, तेव्हा मी वाचन सुरू केले.. डॉक्टर आहे म्हणजे मला इतिहास समजले ,असा अर्थ होत नाही ना !!?? त्यासाठी वाचन करावे लागते. इतिहास समजून न घेता तुम्ही वर्तमान समजून घेऊ शकत नाही.. अर्थशास्त्र शिवाय देशाची आर्थिक स्थिती कशी समजेल ? नागरिकशास्त्र शिवाय मी जबाबदार नागरिक कसा बनेल ?? विज्ञान शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणार नाही. गणित व भूमिती शिवाय तुम्हाला सामान्य जीवनातील मोजमाप आणि व्यवहार समजू शकणार नाही. निबंधलेखन शिवाय तुम्ही तुमचे मुद्दे हे प्रभावीपणे मांडू शकणार नाही.
आता अनेकांचा प्रश्न असतो की एका विषयात तज्ञ झालं तर माणसाने इतर विषयात कशाला ज्ञान घेतले पाहिजे..?? याला दोन उत्तर देता येतात. १) मग, लहान मुलांकडून सर्व विषयात गुण (मार्क) मिळवण्याचे का अपेक्षा धरता ?? लहान मुलांचा मेंदू विकसित की तुमचा मेंदू विकसित आहे..? तुम्ही अधिक प्रगल्भ आहात तर तुम्ही उलट जास्त अभ्यास केला पाहिजे. फालतू बिगबॉस आणि फालतू सीरियल पाहण्यात वेळ खर्च करता त्यापेक्षा वाचन करावे..
2) तुम्ही अवांतर वाचन करत नाही..यामुळे वाचन संस्कृती कमी झाली आहे. मग, गळे काढायचे की आमची मराठी भाषा वाचवा. बुलेट घेवून दाढी वाढवून परप्रांतीय लोकांना शिव्या देवून मराठी भाषा वाचत नसते.. मराठी भाषा वाचन संस्कृतीमुळे जपता येते. अवांतर वाचनने प्रगल्भता येते आणि तुमचा व तुमच्या भाषेचा विकास होतो.. अवांतर वाचन नाही म्हणून राजकारणी लोक "सुशिक्षित लोकांना" पण मूर्ख बनवतात.. त्यांना माहीत आहे की, हा डॉक्टर किंवा इंजिनियर आहे, याला इतिहास काय समजत आहे ? याला काहीही इतिहास सांगा. हा आपला प्रचारक बनतो. सुशिक्षित प्रचारक म्हणून याचे लोक पण ऐकतील .म्हणून अवांतर वाचन करणे, आवश्यक असते.
पाठांतर पेक्षा विषय समजून घेवून अवांतर वाचन करावे..
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment