मिलिंद प्रश्न
"मिलिंद प्रश्न " भारतीय साहित्यमधील प्रसिद्ध पुस्तक आहे. जसे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरू-शिष्य यांच्या संवाद वर "भगवतगीता " हा ग्रंथ हा आधारित आहे. जसे अष्टावक्र आणि राजा जनक या गुरु शिष्य वर आधारित "अष्टावक्रगीता" हा ग्रंथ आहे..तसा बौद्ध भिखु नागसेन आणि राजा मिनांडर (मिलिंद) या गुरू-शिष्य यांच्यातील संवाद वर आधारित "मिलिंद प्रश्न" हा प्रसिद्ध ग्रंथ आहे..
राजा मिनांडर (मिलिंद) हा "बॅक्ट्रिया" चा इंडो-ग्रीक शासक होता. इसवी सन पूर्व 206 ते इसवी सन पूर्व 140 चे दरम्यान बॅक्ट्रीया म्हणजे आताचे ताजकिस्थान अफगाणिस्तान या प्रदेशवर राज्य करत होता. मिनांडर हा मूळचा ग्रीस देशाचा असून त्याचे साम्राज्य हे आताच्या अफगाणिस्तान पासून पाकिस्तान व पंजाब पर्यंत पसरले होते.मिनांडर हा खूप पराक्रमी राजा होताच ,त्या बरोबरच तो खूप हुशार ,वाद विवादात निपुण, तत्वज्ञानी आणि तार्किक होता. त्याचा ग्रीक आणि भारतीय शास्त्र चा सखोल अभ्यास होता. त्याच्याशी वादविवाद करणे सोपे न्हवते. दुसरीकडे, भिखू नागसेन हे "अरहंत " पदावर पोहचलेले ज्ञानी संत व्यक्ती होते. भगवान बुध्द यांच्या नंतर जे जे "बुद्धत्व" ला पोहचलेले व्यक्ती होते, त्यामध्ये भिक्कु नागसेन यांची ओळख आहे.त्यांची ख्याती दूरवर पसरली होती..राजा मिनांडर हा भिक्खू नागसेनशी तत्वद्न्यान वर वादविवाद करण्यास इच्छुक असतो. मनातील कित्येक जटील प्रश्न घेवून मिनांडर हा भिक्खू नागसेन याना भेटण्यास येतो.
जेव्हा भिक्खू नागसेन आणि मिनांडर (मिलिंद) एकमेकांना भेटतात, तेव्हा मिनांडर विचारतो की ,"तुम्हीच नागसेन आहात का ??" नागसेन उत्तर देतात की "नाही , लोक मला नागसेन या नावाने ओळखतात ,पण नागसेन नावाचा कोणीही व्यक्ती अस्तित्वात नाही"... मिनांडर ला विचित्र वाटतं की, हा व्यक्ती नागसेन आहे, पण नागसेन नावाचा कोणीही व्यक्ती अस्तित्वात नाही असे म्हणतो ?? आश्चर्य !!! मिनांडर प्रश्न विचारतो की मग हे चीवर कोणी परिधान केलं आहे? भिक्षा कोण मागतो ? मनुष्य हा मनुष्य नाही मग तो आहे कोण ?? कोण भोग घेतो ,कोण शील आचरण करतो ? कोण चोरी करतो, कोण ध्यान करतो, कोण मिथ्या भाषण करतो ? पाप पुण्य कोण भोगतो ? जन्म कोण घेतो, कोणाचा मृत्यू होतो ? माणूस शरीर आहे की अवयव आहे की मन आहे की काय आहे ?? हे सर्व अस्तित्वात नाही ,असे कसे म्हणायचे ??
पुढे मिनियांडर विचारतो की "आपण रूप,वेदना, संद्या, संस्कार आणि विज्ञान आहात का ?"
भिक्खू नागसेन उत्तर देतात की "नाही", "मी रूप ,वेदना, संज्ञा,संस्कार आणि विज्ञान यातील काहीही नाही".
राजा मिनांडरला पुढे काय प्रश्न विचारावे तेच समजत नाही. आता , भिक्खू नागसेन हे त्याला उलटप्रश्न विचारतात की,
" महाराज , आपण 'रथ' मधून आलात का ? " मिनांडर म्हणतो की "हो, मी रथातून आलो आहे." नागसेन प्रश्न विचारतात की रथामधून त्याची चाके आणि घोडे वेगळे केलं तर तुम्ही त्याला "रथ" म्हणू शकता का ? चाक, घोडे, चाबूक, लगाम, रसी हे "रथ " पासून वेगळे केले तर तुम्ही त्यास रथ म्हणू शकता का ??
मिनियांडर उत्तर देतो की "नाही".
नागसेन विचारतात की ,"मग "रथ " कुठे आहे ??? तुम्ही कोणत्या रथातून आलात ??"
मिनांडर म्हणतो की "हे सर्व रथ नाही, पण मी रथातून आलो "
नागसेन म्हणतात "त्याच पद्धतीने मी शरीर,मन, अवयव, इंद्रिय नाही ;मी काहीच नाही, लोक मला नागसेन म्हनून ओळखतात..मात्र नागसेन नावाचा कोणीही अस्तित्वात नाही...."
मिनांडर या उत्तराने खुश होतो व पुढील प्रश्न विचारतो.. यात देव आहे का, आत्मा आहे का, स्वर्ग आहे का नरक आहे का, मृत्यू नंतर काय होते ? असे प्रश्न असतात आणि नागसेन त्याला उत्तर देतात.
त्यावर हे पुस्तक आहे "मिलिंद प्रश्न".
वास्तविक आपण आपल्या अहंकारात जगत असतो. आपल्याला वाटत की आपण कोणीतरी आहोत. आपण स्वतःला आपल्या नावाने, आडनावने, गावाने, जातीने, धर्माने, देशाने किंवा अजून कोणत्याही पद्धतीने ओळख देण्याचा प्रयत्न करतो. पण वास्तविक आपण यातील काहीच नसतो.. मृत्यू हे अटळ सत्य आहे . मृत्यू हे आपल्या पासून सर्व काही हिरावून घेणार आहे. आपली सामजिक ओळख ही कायमची ओळख नाही. अंतिम सत्य हे आहे की आपण फक्त "जाणीव किंवा बोध" (consciousness) आहोत.. आपण स्वतः ला काहीतरी समजतो इथूनच भ्रांती घडते आणि दुःखाचे बीज पेरले जातात.
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment